काँग्रेसच्या महाअधिवेशनात काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींनी भारतात शाळेतील प्रत्येक मुला-मुलीला सगळ्या आवश्यक लसी मिळाव्या अशी घोषणा केली. आज उपलब्ध असलेल्या सर्व लसी प्रत्येक मुलाला द्यायचे राहुल गांधींनी ठरवले तर प्राथमिक शाळेतून बाहेर पडेपर्यंत प्रत्येक मुलाला किमान चोवीस वेळा सुई टोचावी लागेल. अगदी शाळा नको, पण लसी आवर असे काही पालकांना वाटेल. राहुल गांधीची कल्पना खूप छान आहे. पण आज एवढय़ा
लसी उपलब्ध असताना राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत कुठल्या लसी बुरसटलेल्या विचारांनी तशाच पुढे ढकलल्या जातायत, कुठल्या आवश्यक लसींचा समावेश होणे गरजेचे आहे, टी.व्ही. वर जाहिरात केल्या जाणाऱ्या कुठल्या लसी फसव्या आहेत या गोष्टींचा विचार राहुल गांधींनीच नव्हे तर प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या कन्सल्टिंग रुममध्ये स्क्रीन म्हणून लावलेल्या हिरव्या पडद्या पलीकडे, अशा सामाजिक आरोग्याशी निगडित बऱ्याच चर्चा होत असतात. बऱ्याच गोष्टी मोठय़ा आवेशाने मेडिकल कॉन्फरन्सेसमध्ये सांगितल्या जातात. पण त्यांचा आवाज वातानुकूलित कॉन्फरन्स हॉल बाहेर जात नाही. म्हणून मला प्रत्येकाच्या वैयक्तिक आरोग्याशी व तसेच आपल्या कुटुंबाच्या, गावाच्या, राज्याच्या, देशाच्या आरोग्याशी निगडित व वैद्यकीय क्षेत्रापुरते ‘अंदर की बात’ म्हणून सीमित राहणाऱ्या कल्पनांची, विचारांची बोंबाबोंब भर रस्त्यात, भर चौकात करायची आहे. बोंबाबोंब यासाठी म्हटले, कारण यात डॉक्टरांमध्ये आपापसात, आडोशाला जाऊन दबक्या आवाजात केल्या जाणाऱ्या कानगोष्टी तसेच फार्मास्युटिकल कंपन्या आणि डॉक्टर, शासन आणि सर्वसामान्य आणि कधी कधी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील होणारा छुपा संवाद विसंवाद, सुसंवाद अशा गप्पांना लाऊडस्पीकर उपलब्ध करून द्यायचा आहे. अर्थात या प्रत्येक चर्चेत आपल्या सामाजिक आरोग्याचा स्तर कसा उंचावता येईल हेच ध्येय ठेवायचे आहे.
खेडय़ातून, मुंबई, भारतातील इतर प्रमुख शहरे, परदेश आणि पुन्हा माझे वैजापूर हे गाव या गेल्या दशकातील माझ्या वैद्यकीय प्रवासात एक गोष्ट मला सतत जाणवते. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांना उपचार, काऊन्सिलींग फार फार तर त्या आजाराचे किंवा इतर आजार टाळण्यासाठीचे प्रतिबंधक उपाय या पलीकडे फारसे वैचारिक मंथन होत नाही. रुग्ण कन्सल्टिंग रूममध्ये येतो, बसतो, ट्रीटमेंट घेतो आणि जातो; या पलीकडे बरेच काही घडून गेलेले असते. फक्त त्या रुग्णांच्या आरोग्य शिक्षणापलीकडे त्याची आर्थिक घडी, औषधांच्या किमती, त्या गावातील सरकारी दवाखान्यातील गत, एखाद्या गावात न ओळखता आलेली एखाद्या रोगाची साथ, खाजगी डॉक्टरांचे त्या आजाराबद्दलचे ज्ञान, शासनाचे त्या आजाराबद्दलचे धोरण अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा कधी विचारच होत नाही.
त्यातच आज लोकांना आजाराबद्दलचे ज्ञान, ते टाळण्यासाठीचे ज्ञान बरेच दिले जात आहे. अर्थात आजाराचे, रुग्णांचे प्रमाणच एवढे आहे की हे ज्ञान जितके द्यावे तितके कमीच पडेल. पण तरीही आता ‘हिवाळ्यातील त्वचेची काळजी’ आणि ‘आला उन्हाळा, तब्येत सांभाळा’ छाप आरोग्य पत्रकारितेच्यापुढे जाऊन आरोग्य समस्यांचा र्सवकष विचार करणारे, सामाजिक आरोग्याच्या मूळ समस्या मांडणारी पत्रकारिता गरजेची आहे. ‘एड्स टाळा, एड्स टाळा’, हे ‘कंडोम वापर, एडस टाळा’ हे आता दुसरी तिसरीतल्या शेंबडय़ा पोरालाही कळते. पण कमर्शियल सेक्स वर्कर्स च्या प्रबोधनासाठी मला एका कार्यशाळेत वक्ता म्हणून बोलावले तेव्हा माझे डोळेच उघडले. त्यांच्यापैकी प्रत्येकीचा एक रेग्युलर पार्टनर असतो. ज्याच्याशी संबंध ठेवताना या सेक्स वर्कर्स कंडोम वापरत नाहीत. त्याला त्यांच्या भाषेत आर.पी. (रेग्युलर पार्टनर) असे म्हणतात. खरंतर तो त्यांचा नव्हे अनेकींचा रेग्युलर पार्टनर असतो. पण हे त्यांना अतिशय कळवळीने सांगत असताना त्यांच्यातील एक वृद्ध वेश्या मला म्हणाली. ‘‘बेटा तुझे क्या लगता है? हम इतने साल से धंदा करते है! हमे क्या ये मालूम नही. लेकीन हर डुबती नय्या को लगता है, मै एक दिन पार हो जाऊँगी, हर धंदे वाली को लगता है मेरा भी कोई हो’’ हे आर.पी.(रेग्युलर पार्टनर) नंतर सगळीकडे एड्स पसरवतात. एवढेच काय समाजात अनेक जण हा आपलाच रेग्युलर पार्टनर असल्याच्या भ्रमात वावरत असतात. त्यामुळे फक्त ‘एड्स टाळा’च्या िभतीवरच्या सूचना सर्वाना दिसतात, पण त्या पलीकडे एडस पसरण्याचा मुळाशी असणाऱ्या या मानसिकतेचा विचार कधी होणार?
‘दातांची निगा, दातांची काळजी’ या पलीकडे जाऊन टूथपेस्ट च्या जाहिरातीतील ब्रशवर घेतला जाणारा भरपूर पेस्ट गरजेचे नाही. किंवा ‘‘या एनर्जी ड्रिंकमुळे माझ्या मुलाची उंची वाढल्याचा’’ दावा करणारी जाहिरातीतील आई खोटे बोलते आहे हे जनसामान्यांना कोणीतरी सांगायला हवे.
का कुणास ठाऊक पण राजकीय, अर्थ, मनोरंजन किंवा इतर तत्सम कुठल्याही क्षेत्राबद्दल सर्वसामान्य खूप चिकित्सक असतात, खूप गॉसिप करतात. पण मात्र थेट जीवाशी संबंध असून ही आरोग्य क्षेत्राविषयी तितकीशी वैचारिक कुजबूज होत नाही. पेट्रोल एक रुपयाने महागले की लगेच पहिल्या पानावर बातमी येते. इथे औषधांच्या किमती रोज वाढत आहेत. त्याबद्दल फारसे कुणी बोलत नाही. डिझेलमध्ये भेसळ झाली की आम्ही चिंतीत होतो. पण किती तरी इरॅशनल औषधांची कॉम्बिनेशन डॉक्टर आम्हाला रोज लिहून देतात. त्याबद्दल आम्ही डॉक्टरांना कधी जाब विचारत नाही. कारण वैद्यकिय क्षेत्रातील बऱ्याच गोष्टी झाकून ठेवल्या आहेत, त्या उघडय़ा करायला हव्यात.
महाराष्ट्रातील एका आघाडीच्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांना मी जेव्हा सुचविले की तुम्ही या मुद्दय़ांपेक्षा ‘मुंबईचे आरोग्य आणि महानगरपालिका रुग्णालयांची प्रगती’ एवढय़ा एकाच मुद्दय़ावर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवा. तेव्हा ते मला म्हणाले ‘‘तुम्ही डॉक्टर, वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे तुम्हाला उगीचच आरोग्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि जनता त्याबद्दल संवेदनशील आहे असे वाटत असते. मुळात लोक वेगळ्या मुद्दय़ांबद्दल संवेदनशील असतात. राजकारण्यांचा हा समज आपण खोटा ठरवायला हवा. लोक आरोग्याच्या प्रश्नांबद्दल संवेदनशील नाहीत असे नाही, फक्त या संवेदना जाग्या करण्याची गरज आहे. हेच काम आपण या स्तंभातून करणार आहोत.
amolaannadate@yahoo.co.in
|
|
1 comment:
औषधांच्या वाढत्या किमती पेट्रोल इतक्याच किंबहुना जास्तच त्रास देतात. पण त्यांना पर्याय नसल्यामुळे असेल, लोकं ( ज्येष्ठ नागरिक तरी काही वेळा त्रासून तक्रार करताना आढळतात )घेत राहतात. संवेदनशीलता किबहुना जास्तच आहे. शेवटी जीवाशी खेळ आहे.
लेख भावला.
Post a Comment