बाइकवरून ‘धावलेल्या’ दोघींना मागे टाकत |
प्रसाद लाड, मुंबई, १६ जानेवारी
स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर आलेला एखादा खेळाडू फेरतपासणीत पहिल्या क्रमांकाचा विजेता ठरतो तेव्हा त्यालाही तो सुखद धक्काच असतो. हे घडलंय ते स्टॅण्डर्ड चार्टर्ड आंतरराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये. गेल्यावर्षी अनवाणी धावत परभणीच्या ज्योती गवतेने पूर्ण मॅरेथान स्पर्धेत भारतीय महिलांच्या गटात दुसरा क्रमांक पटकावला होता. यावर्षी ‘शूज’ घालून गेल्यावर्षीपेक्षा कमी वेळात म्हणजे ३ तास पाच मिनिटे आणि ३० सेकंदामध्ये ही स्पर्धा ज्योतीने पूर्ण केली असली तरी स्पर्धेत ती तिसरी आल्याचे जाहीर झाले, तेव्हा तिचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. बावरून न जाता या निर्णयाच्या फेरतपासणीची विनंती ज्योती आणि तिच्या प्रशिक्षकांनी आयोजकांना आणि आय.ए.ए.एफ.च्या अधिकाऱ्यांना केली. तेव्हा दोन स्पर्धकांनी फसवणूक करून पहिला व दुसरा क्रमांक पटकाविल्याचे निष्पन्न झाले आणि अखेर ज्योतीच पहिल्या क्रमांकाची विजेती ठरली.
आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये लाखो स्पर्धक सहभागी होत असतात, पण त्या स्पर्धामध्ये आयोजन एकदम परफेक्ट असते. पण मुंबई मॅरेथॉन मात्र आज या गोष्टीला अपवाद ठरली. गेल्या वर्षी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या वहिदा खान आणि विद्या मेहता यांनी नियम मोडत स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण अखेर त्यांचा हा प्रयत्न अपयशीच ठरला. या दोघींनी बाइकवर बसून काही अंतर पार केले आणि त्यामुळेच त्यांनी पावणे तीन तासात शर्यत पूर्ण केली. आजपर्यंतच्या मुंबई मॅरेथॉनच्या इतिहासात एवढय़ा कमी वेळात कोणाही भारतीय महिला धावपटूने हे अंतर पार केलेले नव्हते. त्यामुळे या दोघींनी एवढय़ा लवकर स्पर्धा कशी संपवली, असा प्रश्न आयोजकांनाही पडला नव्हता. पण ज्योतीने ही स्पर्धा ३ तास ५ मिनिटे आणि ३० सेकंदामध्ये पूर्ण केल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण तिने नामांकित धावपटूंना मागे टाकत आणि सर्वोत्तम वेळ नोंदवत स्पर्धा पूर्ण केली होती. त्यामुळे आपण ही स्पर्धा जिंकलेलो आहोत हा आत्मविश्वास तिला होता. पण शर्यत संपल्यावर तिच्या प्रशिक्षकांनी तिला सांगितले की, तुझ्या पूर्वी दोन स्पर्धक आलेले आहेत आणि तुझा तिसरा क्रमांक आलेला आहे. यावेळी तिला धक्काच बसला. माझ्यापुढे कोणतीही महिला धावपटू नव्हती, असे तिने सांगताच तिच्या प्रशिक्षकांनी आयोजकांकडे फेरतपासणीची विनंती केली. त्यावेळी आयोजकांकडे आणि आय.ए.ए.एफ. च्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा पहिल्या दोन आलेल्या स्पर्धकांच्या चीप तपासल्या तेव्हा त्यांनी केलेली फसवणूक लक्षात आली.
No comments:
Post a Comment