Translate

Saturday, January 8, 2011

खणखणीत कानफाडे ! 'हवाईदौरे करून काही साध्य होणार नाही,'


खणखणीत कानफाडे !
मिलिंद उमरे, गडचिरोली http://www.esakal.com/esakal/20110109/5650661305282442247.htm
केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नक्षलग्रस्त गडचिरोलीचा दौरा नुकताच केला. या आणि आधीच्या अशाच दौऱ्यांबद्दल एका क्‍लास वन अधिकाऱ्याने काही शेरेबाजी केली. 'हवाईदौरे करून काही साध्य होणार नाही,' अशी ही थेट शेरेबाजी होती. ही बेधडक शेरेबाजी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे : राजेंद्र कानफाडे. गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) असलेले हे कानफाडे आहेत तरी कसे?

'हवाई दौऱ्याने काही साधणार नाही' अशी थेट शेरेबाजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या गडचिरोली दौऱ्यावर करणारा एक अधिकारी अचानक प्रसिद्धिमाध्यमांमधील सनसनाटी बातम्यांचा विषय झाला आहे. कुणी त्यांना "निर्भय अधिकारी' म्हटले, कुणी "हा प्रसिद्धीचा स्टंट आहे', असे म्हटले; पण काही क्षणांत असे वादळ उठविणारा हा अधिकारी आहे तरी कोण? हा अधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राजेंद्र कानफाडे! 


चिदंबरम यांच्या दौऱ्याच्या वेळी असे वक्‍तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जाणार, अशी बातमी 30 डिसेंबरला प्रसिद्ध झाली. विशेष म्हणजे, याच 30 डिसेंबर रोजी कानफाडे यांच्या शासकीय कारकीर्दीची पंचविशी पूर्ण झाली आहे. यापूर्वीही नक्षलवादावरून आणि पोलिसांसंदर्भात केलेल्या वक्तव्यांवरून त्यांनी वाद ओढवून घेतले आहेत; पण सतत चर्चेत आणि वादात राहणारा हा वादळी अधिकारी आहे तरी कसा?

निरपेक्षतेचे बाळकडू
छातीपर्यंत रुळणारी पांढरीशुभ्र दाढी, डोक्‍यावरच्या पांढऱ्या शुभ्र लांबसडक केसांची बांधलेली पोनी टेल, हसरा चेहरा, डोळ्यांत एक आगळी चमक आणि साधी वेशभूषा हे वर्णन एखाद्या साधूसंताचे वाटेल; पण क्‍लास वन अधिकारी असलेले कानफाडे अशाच वेशात राहतात. कानफाडे मूळचे नागपूरचे. मध्य प्रदेश सरकारच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या शाळेत त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांच्या वडिलांनी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातही भाग घेतला होता; पण स्वातंत्र्यसैनिकांना देण्यात येणाऱ्या सवलती त्यांनी नाकारल्या. ती आठवण सांगताना कानफाडे म्हणतात ः ""आपल्या आईचे संरक्षण आणि सेवा करण्यासाठी कशाला मोबदला घ्यायचा?''असे वडील म्हणायचे. अशा देशभक्‍ताच्या घरी कानफाडे यांचा जन्म झाला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन 30 डिसेंबर 1985 रोजी ते शासकीय सेवेत रुजू झाले. त्यांची पहिली नियुक्‍ती गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्‍यात झाली. आजही ज्या एटापल्ली तालुक्‍यात जायला अधिकारी घाबरतात, तिथे जायला ते उत्साहाने तयार झाले. नोकरीच्या सुरवातीलाच गडचिरोलीसारख्या जिल्ह्याबद्दल आणि येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल कशा अफवा पसरविल्या जातात, याची त्यांना कल्पना आली. त्या घनदाट रानात त्यांचा माओवाद्यांशीही आमनासामना झाला.

बेधडक स्वभाव
कुही येथे कार्यरत असताना वेलतूर गावात 22 हेक्‍टर जागेतील झाडे तोडण्यात आली होती. तेव्हा कानफाडे कारवाईसाठी गेले. गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला; मग पोलिसांना पाचारण करण्यात आले; पण एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून लगेच पोलिसांनी घटनास्थळाहून काढता पाय घेतला. त्यांनी पोलिस संरक्षणाविनाच कारवाई केली. कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या "वरचे' भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत उतरले; तर काय होते, हे त्यांच्या लक्षात आले. यानंतर असे अनेक अनुभव त्यांना येत गेले. 1993-94 मधे लातूरच्या भूकंपात वरिष्ठांनी विदर्भातील काही अधिकाऱ्यांना पाच दिवसांसाठी पाठविले होते; पण कानफाडे तब्बल दोन महिने भूकंपग्रस्तांच्या मदतीकरिता तेथे राहिले. मोवाडच्या पुरातही त्यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य केले. ज्या काळात महाराष्ट्राला संगणकाची नीटशी ओळखही झालेली नव्हती; त्या काळात त्यांनी "एनआयसी'च्या माध्यमातून सॉफ्टवेअर विकसित केले. नागपुरात असताना याच संगणकाच्या मदतीने त्यांनी जमिनीची तीन हजारांहून अधिक प्रकरणे जलद गतीने लावली होती. मार्च 2010 ला त्यांची बदली पुन्हा गडचिरोलीत झाली. अहेरीच्या उपविभागीय अधिकारी पदावर असताना त्यांनी धान्यवाहतुकीचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. अहेरीत असताना ते अहेरी, एटापल्लीच्या अतिदुर्गम भागात मोटारसायकलने फिरून लोकांच्या भेटी घेत. त्यांच्या समस्या जाणून घेत.

नक्षलवादाचे भय नको
गेल्या ऑगस्ट महिन्यात उच्च न्यायालयाने अनुदानित आश्रमशाळांची तपासणी करण्याचे आदेश दिल्यानंतर कानफाडे यांना बिनागुंडा येथील आश्रमशाळेचा पंचनामा करण्यासाठी पाठविण्यात आले. भरपावसात जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम बिनागुंडाला निघालेल्या कानफाडे यांना नक्षलवाद्यांनी नव्हे; पण पोलिसांनीच अडविले. मात्र, "कर नाही त्याला डर कशाला' असा बाणा असलेले कानफाडे 23 ऑगस्टला एक मंडल अधिकारी, एक तलाठी, एक कोतवाल, एक शिक्षक, एक फोटोग्राफर अशा आठ जणांच्या चमूसह बिनागुंडा येथे गेले. पुराच्या पाण्यातून रानवाटा तुडवत 18 किलोमीटरचा पायी प्रवास त्यांनी केला. तेथील विदारक परिस्थिती बघून ते अधिकच उद्विग्न झाले. दुसऱ्या दिवशी त्या भागातील नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. तिथून परत येत असताना पुन्हा पोलिसी खाक्‍याची प्रचीती आली. एका पोलिसाने लाहेरीजवळ त्यांच्यावर बंदूक रोखली व त्यांना खाली उतरण्यास सांगितले. सोबतच्या तहसीलदारांनी गाडीत "एसडीएम' असल्याचे सांगितल्यानंतरही पोलिसांनी आपली भूमिका सोडली नाही. या वेळी खुद्द राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील त्यांच्या सुखरूप परतण्याची वाट पाहत होते. गडचिरोलीत येताच त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या काही प्रश्‍नांच्या उत्तरादाखल त्यांनी "माओवाद्यांपेक्षा पोलिसच कसे भयंकर आहेत' याचे अनुभव सांगितले. त्यावरूनही शासनात-प्रशासनात प्रचंड गहजब झाला होता. आताही त्यांनी कुणा पत्रकाराला बोलाविले नव्हते किंवा पत्रकार परिषदही घेतली नव्हती अथवा साधे प्रसिद्धिपत्रकही पाठविले नव्हते. पत्रकारांनीच त्यांना प्रश्‍न विचारल्यावर प्रामाणिक उत्तर त्यांनी दिले होते.
गडचिरोलीच्या विकासाबद्दलही कानफाडे यांची मते परखड आहेत.

ते म्हणतात, ""सर्वांत आधी आपल्याला खरेच विकास हवा की नाही, हे ठरवायला हवे. केवळ चर्चा करून उपयोग नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा विचार करताना यातून जे कटू सत्य बाहेर येईल, तेसुद्धा पचविण्याची ताकद हवी. जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली अमाप पैसा ओतण्यात आला; पण त्याप्रमाणात विकास झालेला नाही. भ्रष्ट अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना हुडकून काढणे व त्यांच्यावर शिस्तबद्ध कारवाई करणे आवश्‍यक आहे. याबरोबरच प्रामाणिक अधिकाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी निर्भयतेने आपापली जबाबदारी पार पाडावी. नक्षलवादाची कृत्रिम भीती बाळगण्याची गरज नाही.''

...तर आणखी संधी मिळेल!
निमलष्करी दलाच्या उपयोगितेसंदर्भात कानफाडे म्हणतात, ""निमलष्करी दल वाढले तशी माओवाद्यांची समस्याही वाढतच गेली आहे. त्यामुळे राज्य पोलिस दलाचे सबलीकरण करणे आवश्‍यक आहे. निमलष्करी दलाची आवश्‍यकता आहे किंवा नाही, याचा निर्णय स्थानिक पोलिस अधिकारी व प्रशासनाला असायला हवा. त्यांच्यावर हे दल लादू नये.''

नुकत्याच केलेल्या शेरेबाजीबद्दल होऊ शकणाऱ्या कारवाईची चिंता कानफाडे यांना नाही. ते म्हणतात, ""निलंबन झाले तर, पश्‍चात्ताप मुळीच होणार नाही. शेवटी प्रशासन जनतेलाच उत्तरदायी आहे. त्यामुळे मी माझे काम केले आहे. निलंबित झालो तर आणखी बोलायची संधी मिळेल!''

क्रीडापटू कानफाडे
कानफाडे यांच्या व्यक्तिमत्त्वाला क्रीडाकारकीर्दीचाही पैलू आहे. 200 हून अधिक पदके त्यांनी जिंकली आहेत. वयाच्या 48 व्या वर्षी ते पोहायला शिकले. एवढेच नव्हे तर जिल्हा, राज्य ,राष्ट्रीय व त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाही त्यांनी जिंकल्या. 54 वर्षांच्या कानफाडे यांनी वर्धा येथील मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला; तोही 25 वर्षांच्या तरुणांशी स्पर्धा करत. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियात पर्थ येथे झालेल्या बाराव्या फिना (फेडरेशन इंटरनॅशनल डी नेशन) वर्ल्ड मास्टर चॅम्पियनशिप स्पर्धेत डायव्हिंगमध्ये दोन कांस्यपदके त्यांनी पटकावली. स्वीडनमधील बोथनबर्ग येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्यपदकाची कमाईही त्यांनी केली केली. पण या स्पर्धेत उतरण्यासाठी त्यांना ऑन ड्यूटी पाठविण्यात आले असले, तरी या काळातील वेतन त्यांना अद्यापही मिळालेले नाही. अकरावी स्पर्धा अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे होती. त्या स्पर्धेसाठी निवड झालेली असतानाही केवळ जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसल्याने त्यांना या स्पर्धेला मुकावे लागले होते.

No comments: