Translate

Thursday, August 11, 2011

डॉ. अमोल अन्नदाते

डॉ. अमोल अन्नदाते
रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत बऱ्याचदा उशीर झालेला असतो. मात्र त्या दरम्यान त्याला बेसिक लाइफ सपोर्ट मिळाला तर त्याचे प्राण वाचू शकतात. आपल्याकडे बरेच डॉक्टर्स व नर्सेसही त्याबाबतीत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे लोकांना त्याबाबतीत कितपत ज्ञान असेल, शंकाच आहे. बॉम्बस्फोट किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात बेसिक लाइफ सपोर्टमुळेच अनेकांचे जीव वाचवले जातात. प्रगत देशांमध्ये नागरिकांना त्याचे प्रशिक्षण असते. आपण ते कधी शिकणार?........


दरवेळी बॉम्बस्फोट झाले की मृतांची आकडेवारी, राजकारण्यांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढणे, जगण्याचे स्पिरीट सिद्ध करणे. हे नित्याचेच झाले आहे. पण बॉम्बस्फोटाच्या दुर्घटना स्थानावरील दृश्य पाहून यांना जर योग्य बेसिक लाइफ सपोर्ट मिळाले असते तर.. अशी भावना प्रत्येक संवेदनशील डॉक्टरच्या मनात उमटते. मुळात अशा दुर्घटना झाल्यावर बरीचशी चर्चा ही भावनिक स्वरूपाची असते. पण विज्ञानाचा व संशोधनाचा आधार घेऊन काय करता येईल, यावर विचार होतच नाही. बेसिक लाइफ सपोर्ट व मेडीकल डिझास्टर मॅनेजमेंट विषयीचे अज्ञान अतिरेक्यांइतकेच घातक वाटते. बॉम्बस्फोट, पूर, सुनामी, भूकंप अशा कुठल्याही दुर्घटनास्थळी प्रत्येकाने जीव वाचवण्यासाठी करावयाचे शास्त्रशुद्ध उपाय म्हणजेच बेसिक लाइफ सपोर्ट किंवा डिझास्टर मॅनेजमेंट. जगात निरनिराळ्या दुर्घटना घडत असताना डिझास्टर मॅनेजमेंट व बेसिक लाईफ सपोर्टला अनन्यसाधारण महत्व येत असतानाही दुर्घटनांकडे बघण्याचा आमचा दृष्टीकोन बघे किंवा दुर्घटनास्थळाचे उत्तम फोटो काढण्याच्या पलीकडे गेलेला नाही.
काही वर्षांपूर्वी सुनामी व मुंबई बॉम्बस्फोटानंतर प्रत्येक राज्याला असा डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन व त्याच्या डॉक्टर, पॅरामेडीकल स्टाफसाठी कार्यशाळा राबवण्याचे केंद्र शासनाने बजावले होते. पण ते सगळे कागदावरच राहिले. आपल्याकडे आधीच त्रोटक प्रमाणात असलेल्या आरोग्य सुविधा अशा आपत्तींच्या काळात कशा वापरायच्या याचा आराखडा तयार नसतो. दुर्दैवाने आपल्याकडे पाश्चात्य देशाप्रमाणे अशा वेळी डिझास्टर मॅनेजमेंट टीमला तातडीने बोलावण्यासाठी सर्व देशासाठी समान दूरध्वनी क्रमांक नाही. तसेच डिझास्टर टीमचे कुठले सदस्य साइटवर जातील, कुठले हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहतील याचे व्यवस्थापनही नाही. बॉम्बस्फोट झाल्यावर कोणीही कोणालाही मिळेल त्या वाहनांत कोंबत असतो. अशा असुरक्षित ट्रान्सफरमुळे ही बरेच घोळ होतात. रुग्णांना कसे शिफ्ट करावे, मानेच्या हाडाला म्हणजेच सर्वायकल इंज्युरी टाळण्यासाठी काय करावे? याचे निकष न पाळल्याने अनेकांना आयुष्यभराचे अधूपण येते.
अशा दुर्घटनास्थळी ट्रायएज नावाचा महत्वाचा वैद्यकीय सोपस्कार पार पाडला जातो. ट्रायएज म्हणजे कुठल्या रुग्णाला घटनास्थळावरून कधी शिफ्ट करावे याचे वर्गीकरण. दुर्घटनास्थळी पोहचल्या पोहचल्या एक टीम सर्वप्रथम ट्रायएज करते. त्याप्रमाणे रुग्णांना लाल, हिरवे, काळे, पिवळे झेंडे लावले जातात. काळा झेंडा म्हणजे मृत. त्याला शिफ्ट करण्यापेक्षा इतरांना केल्यास जास्त जीव वाचू शकतील, असे टीमला सुचवायचे असते. हिरवा झेंडा म्हणजे याला लगेच शिफ्ट केले तर त्याचा जीव वाचू शकेल. उदा.:- पाय कापला गेल्याने रक्त वाहते आहे, अशा रुग्णाला हिरवा झेंडा देऊन लगेच शिफ्ट करावे, असे सुचवायचे असते. पिवळा झेंडा म्हणजे याला आरामात शिफ्ट करा, जिवाला धोका नाही व लाल झेंडा म्हणजे शिफ्ट करुनही जीव वाचण्याची शक्यता कमी.
ट्रायएज टीम हे झेंडे लावत असताना लगेच दुसरी टीम ठरल्याप्रमाणे रुग्णांना शिफ्ट करण्यास सुरुवात करते. रुग्णालयात फोनवर लगेच या रुग्णांची माहिती पोहचते. व रुग्ण पोहचेपर्यंत त्याचा बेड व औषधे भरुन तयार असतात. दुर्घटना स्थळावरचे व्यवस्थापन इतके चांगले निश्चित करूनही ट्रायएजच्या झेंडय़ांऐवजी आमच्याकडे दुर्घटनास्थळी केवळ राजकीय झेंडेच दिसतात. पाश्चात्य देशांमध्ये रस्त्यालगत अपघात झाला तर बघ्यांची गर्दी होण्याआधी रुग्णाला एक्सपर्ट टीम रुग्णालयात घेऊन जाते. एवढे चोख व्यवस्थापन आपल्या देशासाठी स्वप्नवतच आहे. पण एवढे नाही तरी थोडय़ा सुधारणा आम्ही नक्कीच करू शकतो.
या नंतर प्रश्न येतो तो बेसिक लाइफ सपोर्टचा. बॉम्बस्फोटच नव्हे तर इतर कुठल्याही दुर्घटनेत शेवटच्या क्षणी जीव वाचवण्यासाठीचे व रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणण्याचे प्रयत्न म्हणजेच बेसिक लाइफ सपोर्ट. महत्वाचे म्हणजे बेसिक लाइफ सपोर्ट देण्यासाठी कुठल्याही डॉक्टरची किंवा मेडिकल इक्विपमेंटची गरज नसते. स्टेशनवर किंवा रस्त्यालगत एखाद्या व्यक्तीला झटके येत असतील की त्याच्या भोवती बघ्यांची गर्दी त्याच्या तोंडातून येणारा फेस बघत असतो. सर्वात चुकीची गोष्ट म्हणजे एखादा त्याला चप्पल किंवा कांदा हुंगवण्याचा प्रयत्न करतो. या व्यक्तीचा मृत्यू झटक्यांमुळे नाही तर त्याच्या छातीत व घशात फेस, उलटी जाऊन होतो. हे टाळण्यासाठी रुग्णाला एका अंगावर झोपवा एवढेच बेसिक लाइफ सपोर्ट शिकवते.
बॉम्बस्फोटच नव्हे तर इतर कुठल्याही दुर्घटनेत शेवटच्या क्षणी जीव वाचवण्यासाठीचे व रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणण्याचे प्रयत्न म्हणजेच बेसिक लाइफ सपोर्ट. महत्वाचे म्हणजे बेसिक लाइफ सपोर्ट देण्यासाठी कुठल्याही डॉक्टरची किंवा मेडिकल इक्विपमेंटची गरज नसते.
पाश्चिमात्य देशांमध्ये बेसिक लाइफ सपोर्ट जवळपास प्रत्येक नागरिकाला येतो. शाळा, कॉलेज व ऑफिसमधून कार्यशाळांच्या माध्यमातून तो शिकवला जातो. त्याची ऑनलाइन वर्कशॉप्स उपलब्ध आहेत. आमच्याकडे सर्वसामान्य नागरिक तर सोडाच पण डॉक्टर, नर्सेसनाही या बेसीक लाइफ सपोर्टचे पूर्ण ज्ञान नाही.
काही दिवसांपूर्वी आम्हा डॉक्टरांसाठी पीडायट्रिक अ‍ॅडव्हान्सड् लाइफ सपोर्टची कार्यशाळा घेतली गेली, तेव्हा डॉक्टरांच्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. सर्व डॉक्टरांनी असे मत व्यक्त केले की एम.बी.बी.एस., एम.डी. झाल्यावर आठ-दहा वर्षांनी आम्ही हे प्रशिक्षण घेतोय व एम.बी.बी.एस. करत असतांनाच हे शिक्षण घेतले असते तर अनेकांचे जीव आमच्या हातून वाचले असते. यातील एका स्त्री डॉक्टरांची प्रतिक्रिया तर सर्वाना हेलावून सोडणारी होती. तिने सांगितले की चार महिन्यांपूर्वी मी घरी एकटी असताना माझे सासरे माझ्या डोळ्यांदेखत कोसळले व रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचे निधन झाले. कदाचित त्यांना मी बेसिक लाइफ सपोर्ट देऊ शकले असते तर ते वाचले असते. म्हणून मी कार्यशाळेत आले.
एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत असतांना आम्हा डॉक्टरांना मुळात रीसस्टेशनचे प्रशिक्षण अशा कार्यशाळांच्या माध्यमातून कधीच दिले जात नाही. त्यामुळे इंटर्नशिपमध्ये कॅज्युअल्टीत अर्धप्रशिक्षित डॉक्टर अत्यवस्थ रुग्णांची हाताळणी करत असतात. अर्थात ज्येष्ठ डॉक्टर मदतीला असले तरी ते येईपर्यंत किंवा के. ई.एम., जे.जे., सायन, नायर सारख्या रुग्णांच्या गर्दीने गजबजलेल्या रुग्णालयांमध्ये बऱ्याचदा रीसस्टेशनची जबाबदारी नवख्या इंटर्नवरच येऊन पडते. मला आठवते इटर्नशिपच्या पहिल्या दिवशी मला एका रुग्णाला कुपर रुग्णालयाहून के.ई.एम.ला शिफ्ट करण्यासाठी रुग्णवाहिकेत अम्बू (हाताने वास देण्याचे मशीन) हातात देण्यात आला. तेव्हा तो अम्बू कसा वापरायचा हेही मला माहीत नव्हते. रीसस्टेशन संदर्भातल्या इतर गोष्टी एम.बी.बी.एस. चालू असताना शिकवल्या गेल्या तरी त्या बहुतांश वेळा पुस्तकी ज्ञानातूनच शिकवल्या जातात, प्रात्यक्षिकातून नव्हे. प्रात्यक्षिकासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मॅनिक्वीन (माणसांचे विशिष्ट प्रकारचे पुतळे) उपलब्ध आहे का? याबद्दलही शंका 
परदेशात आपले विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणास गेले तर त्यांना एक महिन्यांत बेसिक लाइफ सपोर्टसह त्यांच्या स्पेशालिटीचे रीसस्टेशन येत असल्याचे सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय त्याविषयात पुढे रेसिडेन्सी करून दिली जात नाही. आपल्या देशात मात्र आम्ही एम.डी.ची परीक्षा पास होताना आम्हाला या ट्रेनिंगच्या सर्टीफिकेटविषयी विद्यपीठाकडून कधी विचारणा होत नाही. परदेशातील डॉक्टर तर सोडाच, पण पॅरामेडिकल स्टाफ ही यात बऱ्यापैकी पारंगत असतो. अमेरिकेत हॅण्ड्स ओन्ली रीसस्टेशन हे सर्वसामान्यांना प्रशिक्षण दिले जाते. या शासकीय कोर्सच्या जाहिराती अमरिकेत दूरचित्रवाहिनीवर येतात. आम्ही मात्र आमच्या डॉक्टरांनाही अजून हे प्रशिक्षण अनिवार्य केलेले नाही. भारतात ज्या काही कार्यशाळा होतात, त्या अमेरिकन हार्ट असोसिएशन गाइडलाइन्स धर्तीवर होतात. म्हणून हे प्रशिक्षण सुरू करतांना भारताला साजेशा गाइडलाइन्स तयार करता येतील का, याचा ही विचार होणे गरजेचे आहे.
बेसिक लाइफ सपोर्ट, अ‍ॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट, अ‍ॅडव्हान्स्ड कार्डियाक लाइफ सपोर्ट, पिडीयाट्रिक अ‍ॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्टचे प्रशिक्षण एम.बी.बी.एस. तिसऱ्या वर्षांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावे. तसेच एम.बी.बी.एस. प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यर्थ्यांना या स्कील्स नीट येतात की नाही, याची मॅनिक्वीनवर चाचपणी करावी. त्या पास झाल्याशिवाय विद्यर्थ्यांना इंटर्नशिप सुरू करण्याची परवानगी देऊ नये. या प्रशिक्षणाच्या गाइडलाइन्स दर तीन वर्षांनी बदलतात. २०१०-११ च्या नवीन गाइडलाइन्सच्या प्रबोधनाविषयी वैद्यकीय शिक्षकांचे प्रबोधनवर्ग व्हावेत. एम.बी.बी.एस.च नव्हे तर बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस. अशा इतर पॅथींच्या डॉक्टरांनाही बेसिक लाइफ सपोर्टचे प्रशिक्षण अनिवार्य करावे.
आपण ही प्रत्येकाने कुठल्याही दुर्घटनास्थळी बघ्यांची भूमिका घेण्यापेक्षा बेसिक लाइफ सपोर्ट किंवा किमान हॅण्ड्स ओन्ली रीसेसटेशन शिकून घ्यावे. किमान इंटरनेटवर त्याच्या गाइडलाइन्स वाचाव्या. बेसिक लाइफ सपोर्ट शिकलो तर बॉम्बस्फोट किंवा इतर कुठल्याही दुर्घटनेत कदाचित आपल्या हातून एखादा जीव वाचू शकेल. त्यातूनच खरे जगण्याचे स्पिरीट सिद्ध होईल. कारण बेसिक लाइफ सपोर्टचे ब्रीदच आहे - लर्न, लीव्ह, सेव्ह अ‍ॅण्ड लेट लीव्ह अर्थात शिका, जगा, वाचवा आणि जगू द्या.
amolaannadate@yahoo.co.in
http://www.loksatta.com/lokprabha/20110812/vaidyakiya-vatadya.htm










No comments: