Translate

Saturday, July 23, 2011

मंदीराच पावित्र्य , स्वच्छता, शिस्त , शांतता, भक्तीभाव, आदर, मांगल्य

मंदीराच पावित्र्य , स्वच्छता, शिस्त , शांतता, भक्तीभाव, आदर, मांगल्य , सेवाभाव, भक्ताच दर्शन स्वातंत्र्य कसे जपावे याचा आदर्श शिखांच्या गुरुद्वारा पासून महाराष्ट्र मधील मंदीरांच्या पुजारी उर्फ दलालांनी अवश्य घ्यावा. सामान्य माणसा पासून ते हिरो होंडाच्या मालक असलेल्या मुंजाल बंधू पर्यंत सर्वजण हे  सामान्य भाविकांचे पादत्राणे अत्यंत भक्तिभावाने उचलून कोठडीत सांभाळत असतात. कोणी गुरूद्वारयाचे भले मोठे असलेले अंगण साफ करत असतो तर कोणी...........
 
 
मंदिरात प्रवेश करताना पाय साफ व्हावे म्हणुन केलेल्या हौद ची सफाई करत असतो . मला ही पाय साफ करण्याची पद्धत फार आवडते . तुमची इच्छा असो नसो मंदीरात जाण्या आधि तुमचे पाय आपोआपच स्वच्छ साफ  होत असतात. उलट आपण आपल्या मंदीरात गेलो तर एक डोळा देवा कडे आणि एक डोळा मंदीराच्या बाहेर बेवारशी पणे पडलेल्या चप्पले कडे असतो कोणी ती चोरून नेऊ नये म्हणुन.

मंदीराचा आणि माझा तसा छत्तीस चा आकडा.  समजते तेंव्हा पासून मी मंदीरात जाण्याचे शक्यतो टाळतो. कारण देवाच्या घरात असलेली अस्वच्छता , सडक्या फोडलेल्या नारळाचा खराब वास, दहीदूध यांचा नासका संमिश्र वास, देवाच्या गर्भगृहात असलेला अंधार, तेलांच्या  दिव्यां मुळे  आत जळक्या तेलाचा उग्र दर्प येत असतो . हा अंधार  का ठेवला जातो हे कधीच न उलगडणारे कोडे आहे. अत्यंत अरुंद लहानश्या जागे मुळे भाविकांची दर्शना साठी चाललेली ढकलाढकली, खेचाखेची, जाणून बुजून होणारी धक्काबुकी , त्यातच दर्शनाला आलेल्या भाविकां कडून दक्षणा लुबाडण्या साठी देवाच्या दलालांची चालू असलेली भडवेगिरी, गुंडगिरी, भक्ताने भक्तिभावाने देवाला भेट देण्यासाठी आणलेल्या पूजेच्या वस्तू मूर्तीवर उद्दामपणे फेकण्याचा त्यांचा माजोरीपणा. हळद कुंकू गुलाल बुक्का फुले तुळस अस्ताव्यस्तपणे मूर्तीवर टाकण्याचा प्रकार. हे सर्व पाहिल्यावर येथे देव राहात असेल यावर भाविकच काय खुद्द  देव ही विश्वास ठेवणार नाही.
परळी , तुळजापूर ,ते काशी विश्वनाथा च्या मंदिरा पर्यंत हेच घाणीचे साम्राज्य पसरलेले दीसते. मग या वातावरणात देवाच्या स्मरणात कसे मन  लागावे. पण भक्तांचा नाईलाज असतो, आणि फट म्हणता ब्रम्हहत्त्या व्हायची या भीती मुळे कोणी बोलत नाही. शिर्डीच्या साईबाबांचा आणि शिखर शिंगणापूर च्या शनीचा या दलालांनी मांडलेला बाजार पाहीला तर खुद्द बाबा शिर्डीत आणि शनी शिखर शिंगणापूरला जन्मात जाणार नाही एव्हढी येथील भयानक परीस्थिती झाली आहे. शिर्डी हे तर भक्तीचे नव्हे तर फैशनचे विकएंड चे मौजमस्तीचे ठिकाण झाले आहे. रहाणे खाणे पिणे ???,  देव भक्ती दर्शन मौज मस्ती या सर्व गोष्टी एकाच पैकेज मध्ये उपलब्ध असल्या मुळे शिर्डीचा महीमा दिवसेंदिवस वाढत आहे.... बाबांना  पण हिरेजडित सोन्याच्या सिंहासनावर बसवून भक्ताने दीलेल्या देणगीच्या तराजूत बाबांच्या  दर्शनाचा बाजार मांडला गेला आहे. सामान्य भक्ताच्या मिळालेल्या पैशातून शिर्डीतील सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्या पेक्षा विमानतळ उभारण्यात संस्था व्यवस्थापकांना  जास्त रस आहे, म्हणजे जास्तीतजास्त श्रीमंत शिर्डीत येतील. जास्त पैसा कमावता येईल. शनीच्या कोपाच्या नावा खाली शिखर शिंगणापूरला खाद्यतेलाचा जो सत्यानाश चालतो तो पाहून लाज वाटते . येथील घरांना दरवाजे नाहीत घरे उघडी असतात तरी चोऱ्या होत नाही अश्या अफवा आख्यायिका पसरविल्या जातात. ज्या प्रकारे भक्ताला येथे  लुबाडले जाते तो  प्रकार पाहून कायद्याने या वर बंदी घालावी असे वाटते . हे देवाचे दलालाच भक्ताला एव्हढे लुबाडतात म्हणुन तेथे बाहेरचे कोणी तेथे राहात नाही आणि म्हणुन तेथे चोऱ्या सुद्धा होत नाहीत. महाचोराच्या ठगाच्या घरी चोरी करण्याची सामान्य माणसाची काय बिषाद .

दक्षिणेच्या श्रीमंत मंदीर तिरुपतीची तर गोष्टच वेगळी. आपल्या भ्रष्ट्राचाराच्या  बेईमानीने , काळा धंदा करून कमावलेल्या काळ्या पैश्याच्या कमाई चा या देवाला चक्क भागीदार करून दरवर्षी त्याचा हिस्सा त्याला देण्यास जाणारे लाखो भक्त भारतात आहेत. बेनामी करोडोची संपत्ती या देवाला आणि साईबाबांना वाहिली जाते. कोणतीही लिखापढी नाही टक्स भरणे नाही.तरी असा पैसा देऊन सामान्य माणसाच्या अंगावर पाय देत त्यांना लाथाडत हे मुजोरपणे सरळ बालाजीच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. काळ्या पैश्याला प्रोहस्थान देणाऱ्या या बेनामी देणग्या कायद्याने बंद करावयास पाहिजेत. गुरुद्वारात भक्तांना प्रसाद म्हणुन पोटभर जेवण्याची व्यवस्था पैश्याची कसली ही अपेक्षा न ठेवता २४ तास लंगर म्हणून उपलब्ध असते तेथे.... आपल्या मंदीरात प्रसादाच्या नावाचा लाडू अवाच्या सव्वा भावात विकून त्यात ही भक्तांना लुबाडले जाते. या लुटमारीच्या जगात स्वताहून जाऊन आ बैल मुझे मार हा प्रयोग करण्या पेक्षा घरीच संगणकावर दर्शन घेऊन आपण आपले कर्म  इमाने इतबारे करणे हेच आपल्या हातात आहे .संत सांगूनच गेलेत की ......भक्तांची क्षमा मागून....
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी
देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून
कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी
अवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी..............


1 comment:

Anonymous said...

achha likha hain, keval itna kaphi nahin aapko print media me bhi dena chahiye.