Translate

Wednesday, September 15, 2010

माँ तुझे सलाम!!!

 माँ तुझे सलाम!!!
एकदा एक निर्णय घेतला, की त्याच्याशी ठाम राहणे, प्रसंगी आत्मक्‍लेश सहन करणे आणि टीकाटिप्पणी होत असतानाही आपल्या निर्णयाशी तडजोड न करण्याला फार मोठे मानसिक बळ, तसेच धैर्याची गरज असते. आपल्या निर्णयाशी प्रतारणा न करणारी माणसे तशी कमीच असतात. योगायोगाने या गटात मोडणाऱ्या दोन स्त्रियांचं आहे. आणि या दोघीजणी आशिया खंडातील आहेत. फक्त फरक एकजणी लष्करी हुकुमशहाच्या लष्करी अत्त्याचाराला बळी पडली तर दुसरी आपण विचारकरू शकणार नाही अश्या महान अहिंसावादी, उठसुठ महात्मा गांधीच्या नावाचा जप करणाऱ्या लोकशाहीच्या भ्रष्ट्र बेईमान राजकारण्याच्या लोकशाही अत्त्याचाराला बळी पडली आहे. हे वर्णन वाचून तुम्हाला भारताची आठवण झाली असेल. तर दुर्देवाने आपल्या आठवणीने आपणास दगा दिला नाही असे मला खेदाने मान्य करावे लागेल. या मध्ये ईशान्य भारतातील मणिपूर येथील इरोम शर्मिला चानू आणि म्यानमार मधील आँग सान स्यू की या दोघींचा समावेश आहे. पहिल्या क्रमांकावर यांचे नाव इतिहासकाराला लिहावेच लागेल एव्हढे मोठे यांचे ऐतिहासिक कार्य आहे.





म्यानमार मधील आँग सान स्यू की चे नाव तर अनेक वर्षा पासून आपण ऐकत आलो आहोत.पण
दुसरे नाव इरोम शर्मिला चानू आपण भारतीय असून हे नाव फारसे कधी एकले नाही , किंवा हिचा संघर्ष आपणास कळलाच नाही याची लाज वाटते. सरकारने स्वत;च्या स्वार्था साठी हा संघर्ष लपवलाच पण २४ तास ब्रेकिंग न्यूज च्या बातम्यांचा रतीब घालणाऱ्या TV ने ही याकडे दुर्लक्षच केले.ही भारतातील सात बहिणी राज्ये (सात बहिणी- ईशान्येकडील सात राज्ये - आसाम, अरुणाचल, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय ) यांची शोकांतीका आहे. शासनकर्त्याच्या कानावर यांचा आक्रोश गेला नाही का? विकासाचे ढोल बडविणाऱ्या आणि महात्म्याच्या अहिंसेची आरती करणाऱ्या भारतीय शासनाची प्रवृत्ती लातोंके भूत बातोंसे मानते नही या स्वरुपाची झाली आहे .
काश्मिरात भारता विरुद्ध नारे लावत सैन्यावर दगडफेक करून जनजीवन अस्थाव्यस्त करणाऱ्या देशद्रोह्या समोर सरकार सपशेल लोटांगण घालत घुडगे टेकून शरण जावून मतांच्या लाचारी साठी काश्मीरला अजून जास्त स्वायत्तता देण्यास तय्यार होते. पण भारतीय लष्कराच्या दडपशाही विरोधात गांधीजींच्या अहिंसा मार्गाने आमरण उपोषण करून विरोध करणाऱ्या इरोम शर्मिला चानू
यांच्या उपोषणाच्या निर्णयाला येत्या दोन नोव्हेंबर रोजी दहा वर्षे पूर्ण होतील. ईशान्य भारतातील मणिपूर या राज्यात लागू असलेला सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (एएफएसपीए) रद्द करावा, या मागणीसाठी त्या गेली नऊ वर्षे उपोषण करीत आहेत. या वर्षीचा रवींद्रनाथ टागोर शांतता पुरस्कार त्यांना इंफाळमध्ये नुकताच देण्यात आला. "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट'चे संस्थापक-संचालक एम. के. चौधरी यांच्या हस्ते इंफाळच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात जाऊन शर्मिला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५१ लाख रुपये रोख, सुवर्णपदक आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ""सामाजिक कर्यकर्त्या असलेल्या शर्मिला यांचा मानवी हक्कांच्या अधिकारांसाठी असलेला हा लढा अद्वितीय असून, त्यांची मागणी निश्‍चित मान्य होईल,'' असा विश्‍वास चौधरी यांनी या वेळी व्यक्त केला. मात्र पुरस्कार काहीही मिळाला तरी आपल्या निर्णयापासून शर्मिला दूर होण्याची चिन्हे नाहीत.
शर्मिला यांचा लढा सुरू आहे तो अन्यायाच्या विरोधात, मणिपूरमध्ये असलेल्या सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्याच्या (एएफएसपीए) निषेधात. या कायद्याच्या विरोधात ईशान्येकडील राज्यांत संतापाचे सूर उमटत असतात. सर्व स्वातंत्र्याची गळचेपी हा कायदा करीत असल्याचे त्याच्या विरोधात असलेल्यांचे मत आहे. शर्मिला काही ठरवून या कायद्याच्या विरोधात उपोषणाला बसल्या नव्हत्या; पण नोव्हेंबर २००० मध्ये मालोम येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी दहा नागरिकांना दहशतवादी समजून ठार केल्यावर संतापलेल्या शर्मिला यांनी ताबडतोब बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आणि आजपर्यंत त्यांचे उपोषण सुरूच आहे! अगदी निश्‍चित तारीखच सांगायची, तर दोन नोव्हेंबर २००० पासून या उपोषणाला प्रारंभ झाला आहे आणि मोसंबीचा रस घेऊन हे उपोषण सुटण्याची चिन्हे नाहीत. प्रथम द्रवरूप पदार्थ घेण्यासही शर्मिला तयार नव्हत्या; पण नाकात बसविलेल्या नळीतून दिल्या जाणाऱ्या या पदार्थांवर शर्मिला सध्या जगत आहेत. आत्महत्येच्या प्रयत्नाचा आरोप ठेवण्यात आल्याने कोठडीची मुदत संपली, की त्यांना न्यायालयापुढे हजर करावयाचे आणि पुढची तारीख मिळवून परत आणायचे, असा क्रम सुरू आहे. नंदा आणि इरोम शाकी या दांपत्याला नऊ मुले. त्यांत शर्मिला हे शेंडेफळ. त्यांचा जन्म १९७२ चा. लहानपणापासून संवेदनशील आणि आपल्या मतांबाबत आग्रही असलेल्या शर्मिला यांनी नऊ वर्षे उपोषण सुरू ठेवावे, यात त्यांच्या सहकाऱ्यांना आश्‍चर्य वाटत नाही. उपोषणाच्या या काळात अनेक पुरस्कार त्यांना मिळाले, पण त्यामुळे त्या हुरळून गेल्या नाहीत आणि त्यांचा निर्धारही कायम आहे. आपल्या मागणीशी एवढी ठाम राहणारी माणसे विरळाच.
जावू द्या, आपण कश्याला डोक्याला ताप करायचा त्या ठणठणपाळ यांना कांही काम नाही. आधी नाहीरेची, अविकसित भागातल्या जनतेची गाऱ्हाणे मांडत आमचे सुंदर, सुखी जीवन खराब करत होते . आता त्या अतिपूर्वे कडील सात राज्यातील भारतीय लोकशाही शासनाच्या लष्कराच्या दडपशाहीच्या भयानक अंगावर कांटा येणाऱ्या बातम्या आम्हाला सांगून, मानसिक त्रास देवून यांना काय आनंद भेटतो हे देव जाणे. या सात राज्यांशी आमचा काय संबंध ?
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

No comments: