Translate

Tuesday, February 12, 2013

महाराष्ट्र शासनाने दुष्काळ निवारण कामा च्या प्रसिद्धी साठी ब्रांड एंबेसेडर नेमण्याचे ठरविले

महाराष्ट्र शासनाने दुष्काळ निवारण कामा च्या प्रसिद्धी साठी ब्रांड एंबेसेडर नेमण्याचे ठरविले
गेल्या दहा हजार वर्षात पडला नाही असा दुष्काळ महाराष्ट्र देशी पडला......पाण्याची टंचाई, चाऱ्याची टंचाई ....सिंचन , वीज लोड शेडींग या प्रश्नांना, समस्याना सामोरे जात असतानाच विरोधकांच्या स्वकीयांच्या टीकेला, भडीमाराला तोंड देतादेता सरकार ची दमछाक झाली ..... सरकारने दुष्काळ  निवारण्या साठी केलेल्या कामाची माहीती जगाला कळावी आणि विरोधकांचे तोंड बंद करावे म्हणून महाराष्ट्र सरकारच्या दुष्काळ निवारण्या करता नेमलेल्या उच्च समितीने महाराष्ट्र सरकारला एक दुष्काळ निवारण ब्रांड एंबेसेडर ( राजदूत ) नेमण्याची अफलातून कल्पना मांडली, आणि ती सरकारने लगेच स्वीकारली. त्या नुसार सरकारने दुष्काळ निवारण ब्रांड एंबेसेडर नेमण्या करता जाहिरात देण्यात आली.
जाहीरात !!             जाहीरात !!       जाहीरात !! 
महाराष्ट्र शासनाने दुष्काळ निवारण कामा च्या प्रसिद्धी साठी ब्रांड एंबेसेडर नेमण्याचे ठरविले असून त्या संबंधी योग्य व्यक्तीची नेमणूक करण्या करता अर्ज मागविण्यात येत तरी इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावे. अटी शर्ती मानधन कामाचे स्वरूप इत्यादीचा तपशील पुढील प्रमाणे ..

१) उमेदवार हा जन्माने महाराष्ट्राचाच रहावाशी असावा . त्याला मी मराठी असल्याचा गर्वच नाही तर माज असावा. बाहेरच्या राज्यात जन्मलेल्या पण महाराष्ट्रात राहून प्रसिद्धी पावलेल्या उमेदवारांनचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

२)त्याला मराठी, विशेषत इंग्रजी हिंदी चांगल्या प्रकारे भावनात्मक आवाजात बोलता आली पाहिजे . कारण या जाहिराती राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावर करावयाच्या आहेत.हे लक्षात घ्यावे.

३) अर्जदार हा थ्री पेज वर तसेच मिडीया वर चमकणारा असावा.

४) अर्जदाराला प्रत्यक्ष दुष्काळाचा अनुभवाची गरज नाही......पण त्याला फक्त रेडी,अक्शन, कट फ्लूड लाईट च्या प्रखर प्रकाशात काम करण्याचा अनुभव असावा..... त्याला फक्त वातानुकुल A /C स्टुडीओ मध्ये दिग्दर्शकाच्या सांगण्या प्रमाणे फिल्मी लेखकाने लिहून दिलेले डॉयलॉग्ज कॅमेरया समोर भावनात्मक रीत्या बोलावे लागतील. हा दुष्काळ शासन निर्मित नाही पण शासन या संकटाचा सामना चांगल्या प्रकारे करत आहे हे जनतेला जाहीराती द्वारे पटवून द्यावे लागेल .

५) निवडलेल्या ब्रांड एंबेसेडर ला मानधन पाच कोटी रुपये देण्यात येईल तसेच रोज कामाच्या दीवशी त्यास अकरा हजार रुपये टी ए डी ए , मांसाहारी, स्वीट्स भोजन आणि पेयपान सरकारी खर्चाने दीले जाईल .

६) कामाचा कालावधी जून-जुलै २०१३ पर्यंत पाऊस पडे पर्यंत राहील...कोणत्या ही परिस्थितीत त्यास काम सोडून जाता येणार नाही किंवा दुसऱ्या राज्याच्या दुष्काळाची/कामाची जाहीरात करता येणार नाही....किंवा शुटींग च्या दिवशी गैरहजर राहता येणार नाही.

७) राज्य मंत्रीमंडळाच्या सहा मंत्र्यांची निवड समिती ज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस चे प्रत्येकी तीन तीन मंत्री राहतील.

८) या नेमणुकीसाठी उमेदवारांनी कोणत्या हि प्रकारचे लॉबिंग, शिफारशी, वशिलेबाजी, रिश्वत देणे हे प्रकार करू नयेत . केल्यास त्यास स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

९) मंत्रिमंडळाच्या समितीने नेमलेल्या उमेदवाराची निवड अंतिम राहील त्या विरुद्ध कोणास ही न्यायालयात जाता येणार नाही.

महाराष्ट्र शासन मुख्य सचिवांच्या सहीनिशी

No comments: