Translate

Monday, February 8, 2010

दहशतवाद्याला "पद्म'मुळे काश्‍मिरात संताप



दहशतवाद्याला "पद्म'मुळे काश्‍मिरात संताप
सकाळ वृत्तसेवा यांच्या सोजन्याने
Monday, February 08, 2010 AT 12:27
जावेद मात्झी
शरण आलेल्या दहशतवाद्याला यंदा "पद्मश्री' जाहीर झाल्याने जम्मू-काश्‍मीरमध्ये नाराजी आहे. अनेक गुन्हे नावावर असलेल्या केन्नाला हा पुरस्कार कशासाठी, असा सवाल केला जात आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा जाहीर झालेल्या "पद्म' पुरस्कारांमुळे निर्माण झालेला वाद जम्मू-काश्‍मीरमध्येही पोचला आहे. शरण आलेल्या एका दहशतवाद्याला "पद्मश्री' जाहीर झाल्यामुळे संशयाचे धुके निर्माण झाले आहे. या संदर्भात राज्य सरकारने केलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून केंद्राने या दहशतवाद्याला पुरस्कार जाहीर केल्याचे कळते.

बडगाम आणि बारामुल्ला जिल्ह्यातील मगाम-तंगमर्ग परिसरात गुलाम महंमद मीर ऊर्फ मोमा केन्ना हे नाव प्रसिद्ध आहे. १९९० मध्ये त्याने सीमा सुरक्षा दलापुढे शरणागती
पत्करली आणि फुटिरतावादाच्या विरोधात काम सुरू केले. वन खात्यात रोजंदारीवर काम करणारा केन्ना पूर्वी लाकूड तस्कर म्हणून माहिती होता. फुटिरतावादाच्या विरोधात काम करताना त्याने अनेकांना छळले आणि ठारही केल्याचे स्थानिक लोक सांगतात. बलात्कारापासून खुनापर्यंतचे आरोप त्याच्यावर केले जातात. या परिसरातील पोलिस ठाण्यांत त्याच्याविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत. "पद्म' पुरस्कारासाठी केन्नाच्या नावाची शिफारस केल्याची आपल्याला माहितीच नव्हती, असे सांगून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सगळ्यांना आश्‍चर्याचा धक्का दिला. ""आमच्या सरकारने त्याच्या नावाची शिफारस केलीच नव्हती. दहशतवाद्याला ठार करणाऱ्या रुख्सानाच्या नावाची शिफारस आम्ही केली होती,'' असे त्यांनी सांगितले.

केन्नाला "पद्मश्री' जाहीर झाल्यावर खरा धक्का राज्य सरकारलाच बसला. पुरस्कार विजेत्याला शोधून काढण्यासाठी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) तब्बल तीन दिवस लागले. दिल्लीहून जाहीर झालेल्या नावांत फक्त गुलाम महंमद मीर एवढाच उल्लेख होता. पुरस्काराबाबत काही माहिती नसल्याचे ओमर यांनी सांगितले, तर त्यांचे वडील डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी मात्र आपणच या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले. डॉ. फारूक यांच्याबरोबरच राज्याचे कृषिमंत्री गुलाम हसन मीर आणि मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबिबुल्ला यांनीही केन्नाच्या नावाची पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे कळते. वडील आणि "नॅशनल कॉन्फरन्स'च्या अध्यक्षांनी केलेल्या शिफारशीची मुख्यमंत्री असलेल्या मुलालाच कल्पना नसल्याचे या गोंधळातून स्पष्ट झाले. हाताखाली काम करणारे नोकरशहा काय शिफारशी करतात याचीही कल्पना मुख्यमंत्र्यांना नव्हती. ही खरोखरच बेफिकिरी आहे, की दुसरे काही हा खरा प्रश्‍न आहे.

कला, संस्कृती, साहित्य, विज्ञान, सामाजिक सेवा आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना "पद्म' पुरस्कार दिले जातात, असा इतिहास आहे. शरण आलेल्या दहशतवाद्याचे नाव अशा पुरस्कारासाठी सुचविल्याबद्दल केंद्राने राज्य सरकारवर केलेल्या टीकेला काही अर्थ आहे. केन्नाच्या नावाची शिफारस करणाऱ्यांना आता काही समर्थनही करता येत नसल्याचे चित्र आहे. दहशतवाद्यांविरुद्ध केन्नाने सुरक्षा दलांना मदत केलीही असेल; पण त्याचे सामाजिक कार्य शून्य आहे. विविध पोलिस ठाण्यांत त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांचे काय? लाकूड तस्कर म्हणून कुख्यात असलेल्या केन्नाने हजारो वृक्षांची तोड केली आहे आणि अनेकांना ठारही केले आहे. सुरक्षा दलांच्या आशीर्वादामुळे बलात्कार, खंडणी, अपहरण आणि लुटालुटीतही केन्नाचा हात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. अशा या माणसाची "पद्म' पुरस्कारासाठी शिफारस केली गेल्याने लोकांना धक्का बसला आहे.

केन्नासारख्या गुन्हेगाराचे नाव "पद्म' पुरस्कारासाठी सुचविणे म्हणजे काश्‍मिरी जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे असल्याची टीका विरोधी "पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी'च्या (पीडीपी)
नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. काश्‍मिरी जनतेच्या मारेकऱ्यांबद्दल केंद्राच्या भावना काय आहेत याची कल्पना या निर्णयामुळे येत असल्याचे "हुरियत'ने म्हटले आहे. उच्च न्यायालयाची बार असोसिएशन, मानवी हक्क संघटना यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. दुसरीकडे, केन्ना मात्र या निर्णयाचे समर्थन करतो. पाच हजार दहशतवाद्यांना ठार करण्यात किंवा अटक करण्यात मदत केल्यामुळे माझा या पुरस्कारावर हक्कच असल्याचे केन्ना सांगतो.

No comments: