Translate

Saturday, November 5, 2011

टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना लिहिलेले हे पत्र जसेच्या तसे

पंतप्रधान महोदय,
आपल्या सरकारने माझा राजीनामा मंजूर करण्याच्या बदल्यात सव्वानऊ लाख रुपये जमा करण्यास सांगितले आहे (यात दीड लाख रुपये संगणकांसाठी घेतलेल्या कर्जाचे आहेत). मी काहीही गुन्हा केलेला नसताना मला शिक्षा दिली जात आहे, असे मागील पाच वर्षांपासून मी सरकारला सतत सांगत असलो तरी सरकार हे समजून घ्यायला तयार नाही. नोव्हेंबर 2002 मध्ये दोन वर्षांच्या अभ्यास रजेनंतर मी पुन्हा आयकर कार्यालयात रुजू झालो. त्यानंतर एक वर्षभर मला टोलवण्यात आले. मला कुठली पोस्टिंगच दिली नाही. वर्षभर घरबसल्या मला सरकारने पगार दिला. मी बिनकामाचा होईन, अशी भीती मला वाटू लागली..................



या वेळी माझ्या फाइलवर पंतप्रधान कार्यालयानेही अभ्यास केला असून, मी दोषी असल्याचे त्यातून निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येत आहे; पण माझा गुन्हा काय आहे, तेच मला अजून कळलेले नाही. तो कळला तर भविष्यात तसे होऊ नये याची खबरदारी मला घेता येईल.
मी 1 नोव्हेंबर 2000 रोजी दोन वर्षांची अभ्यास रजा घेतली होती. दोन सरकारी खात्यांमधील भ्रष्टाचाराची कारणे शोधून तो दूर करण्यासाठी सूचना करीन, असे मी तेव्हा म्हणालो होतो. त्या वेळी मी आयकर उपायुक्त होतो. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या आयकर व वीज खात्यासंबंधी अडचणींची माहिती गोळा करायला मी सुरुवात केली. या अडचणी वेळेवर न सोडवता लोकांना लाच देण्यासाठी विवश केले जात होते. आयकर खात्याशी संबंधित 700 पेक्षा जास्त आणि वीज खात्याशी संबंधित 2800 पेक्षा जास्त लोकांच्या अडचणींची माहिती मी गोळा केली. मी सर्वप्रथम या दोन्ही खात्यांच्या अधिकार्‍यांवर दबाव टाकून 3500 लोकांच्या अडचणींचे लाच दिल्याशिवाय निराकरण केले. मग या अडचणींचा तपशीलवार अभ्यास करून त्या उद्भवू नयेत यासाठी दोन्ही खात्यांना सूचना केल्या.
दिल्लीमध्ये लक्ष्मीनगर, नंदनगरी व नेहरू प्लेस येथील वीज कार्यालयांच्या दारासमोर आम्ही रोज खुच्र्या-टेबल टाकून रोज बसायचो आणि तेथे येणार्‍या नागरिकांनी लाच देऊ नये, असे आवाहन करायचो. तेव्हा आम्ही अनेक लोकांची कामे लाच दिल्याशिवाय करून दिली. याचा फायदा असा झाला की, या कार्यालयातून पूर्वी दरमहा 50 खटले वीज न्यायालयात दाखल होत असत. ती संख्या 10 पेक्षाही कमी झाली. आता सांगा.. अभ्यास रजेवर असताना मी काही चूक किंवा गुन्हा केलाय का?
नोव्हेंबर 2002 मध्ये दोन वर्षांच्या अभ्यास रजेनंतर मी पुन्हा आयकर कार्यालयात रुजू झालो. त्यानंतर एक वर्षभर मला टोलवण्यात आले. मला कुठली पोस्टिंगच दिली नाही. वर्षभर घरबसल्या मला सरकारने पगार दिला. मी बिनकामाचा होईन, अशी भीती मला वाटू लागली.
माझ्या सुट्याही शिल्लक नसल्यामुळे मी दोन वर्षांची बिनपगारी रजा घेतली. ही रजा खात्याने रीतसर मंजूर केली होती. या सुटीदरम्यान मी प्रशांत भूषण व शेखरसिंह यांच्या सहकार्याने माहिती अधिकार कायद्याचा मसुदा तयार केला. या प्रक्रियेत अरुणा रॉय यांची महत्त्वाची भूमिका होती. हा कायदा लागू झाल्यानंतर तो प्रभावीपणे अमलात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला सुरुवात केली.
माहिती अधिकाराचा वापर करून आम्ही दिल्लीतील अन्नधान्य चोरी आणि पुरवठा खात्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे उचलून धरली. या दरम्यान आमच्या सात कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले करण्यात आले. आमच्या एका कार्यकर्तीच्या गळ्यावर चाकूचे वार करण्यात आले. या सर्व हल्ल्यांचे विवरण आणि दिल्लीतील पुरवठा खात्यातील चोरीचे पुरावे आम्ही माननीय सुप्रीम कोर्टासमोर ठेवले तेव्हा जस्टिस वाधवा कमिशन नेमण्यात आले.
मग असे वाटू लागले की, पुन्हा कार्यालयात जाऊन नोकरी करणे बरे नाही. पुढील आयुष्य याच कार्याला वाहून घ्यावे, असा विचार करून फेब्रुवारी 2006 मध्ये आयकर खात्यातील नोकरीचा मी राजीनामा दिला.
मी आपल्याला पुन्हा विचारतो की, बिनपगारी सुटीदरम्यान माहिती अधिकार कायद्याबाबत काम करून मी काही चूक केली आहे का? मी 1 नोव्हेंबर 2000 रोजी अभ्यास रजा घेतली होती तेव्हा सरकारबरोबर एक करार केला होता. त्यानुसार रजेवरून परतल्यानंतर तीन वष्रे मी राजीनामा देणार नाही. त्यामुळेच मला रजेदरम्यान पूर्ण पगार मिळत होता. मीही माझे वचन पाळले. रजेवरून परतल्यानंतर साडेतीन वर्षांनी मी राजीनामा दिला.
मी अनेक मित्रांचा आणि कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. सर्वांचे म्हणणे आहे की, कायद्याच्या दृष्टीने माझे काहीही चुकलेले नाही. तरीही आपले सरकार अभ्यास रजेच्या काळात मला मिळालेला पगार व्याजासह परत करण्यास सांगत आहे. मी अभ्यास रजेवरून परतल्यानंतर दोन वर्षांची बिनपगारी रजा का घेतली, असे आपले सरकार आता विचारत आहे. मी वर लिहिले आहेच की, मला वर्षभर कुठलाही कार्यभार देण्यात आला नाही. अशा परिस्थितीत साडेतीन वष्रे काहीही काम न करता मी पगार घेतला असता तर ते जास्त योग्य ठरले असते, असे आपल्याला वाटते का?
गंमत अशी आहे की सुटीच्या काळात मी जे काम केले त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅगेसेसे पुरस्काराने मला गौरवण्यात आले; पण भारत सरकारच्या दृष्टीने हे काम इतके चुकीचे आहे की त्यासाठी मला गुन्हेगार ठरवण्यात आले.
मी या पत्रासोबत 9,27,787 रुपयांचा चेक (क्र. 938313, 3 नोव्हेंबर 2011) जोडत आहे. याचा अर्थ असा नाही की, मी गुन्हा कबूल करीत आहे. मी काय गुन्हा केला हेच मला माहीत नाही. त्यामुळे तो कबूल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे पैसे मी निषेध म्हणून जमा करीत आहे. माझा राजीनामा लवकरात लवकर मंजूर करण्यास आपण वित्त मंत्रालयाला सांगितले तर मी आपला आभारी राहीन. राजीनामा स्वीकारल्यानंतर मी कोर्टात जाऊन हे पैसे परत मागण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.
सध्या सगळी सरकारी यंत्रणा टीम अण्णाच्या सदस्यांमागे हात धुऊन लागली आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, मला ज्यांनी पैसे उसने दिले आहेत त्यांना तरी किमान आपल्या सरकारने त्रास देऊ नये.
(टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना लिहिलेले हे पत्र जसेच्या तसे)
मी काय गुन्हा केला ते तरी सांगा : अरविंद केजरीवाल

No comments: